‘उध्दव ठाकरेंनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बुधवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधकांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोमणे मारले. यामध्ये “सुधीर मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवारांना कोपरखळी मारली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष भाजपानं राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवर टीका केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपासून भाजपाच्या अनेक नेतेमंडळींनी सरकारच्या धोरणांवर तोंडसुख घेतलं आहे. त्यापैकी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरून आगपाखड केली आहे.

दरम्यान, मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. कामकाज ऐकताना अचानक मला भास झाला की मी नटसम्राट बघतोय. मी अथेल्लो, मी हॅम्लेट.आणि शेवट असा केविलवाणा वाटला की कोणी किंमत देता का किंमत! सुधीरभाऊ काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश.. देवेंद्रजींना भिती वाटायला लागली की आमचं कसं होणार? कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होता, ते छान होतं”, असं उद्धव ठाकरे अधिवेशनाच्या भाषणात म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी देखील टोला लगावला आहे. “अधिवेशनामधील उद्धव ठाकरे यांचं भाषण हे शिवसेनाप्रमुखासारखं होतं. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय प्रश्न उपस्थित केले. राज्यातील विविध प्रश्न आम्ही उपस्थित केले होते. त्यावर मात्र उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण ऐकून त्यांनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं, अशी मी ईश्र्वरचरणी प्रार्थना करतो”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

खोटं बोला पण रेटून बोला – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात मुख्यमंत्री उसने अवसान आणून बोलले. सत्य काय ते त्यांना माहिती आहे. खोटं बोला पण रेटून बोला हे मुख्यमंत्र्यांचे नवे रुप बघायला मिळाले असे फडणवीस म्हणाले. शिवसेना स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हती हे मुख्यमंत्री म्हणाले पण सोबतच त्यांनी रा. स्व. संघाचा उल्लेख केला. संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार हे स्वत:च स्वातंत्र्यसैनिक होते. आमच्या हिंदुत्वावर शंका घेणारे मुख्यमंत्री हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, हे कुठले हिंदुत्व, असा सवाल फडणवीस यांनी केला. हिंदुंचा अपमान करणाऱ्या शर्जिल उस्मानीची उत्तर प्रदेशात हिंदुंविरुद्ध गरळ ओकण्याची हिंमत झाली नाही, त्यासाठी तो महाराष्ट्रात येऊन बोलला, अशी टीका त्यांनी केली.

…तो व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मी कोरोना काळात फेसबुक लाईव्ह करतो होतो. या फेसबुक लाईव्हरील फीडबॅकमधून मिळालेल्या माहितीनुसार, याच फेसबुक लाईव्हमुळे महाराष्ट्रातील जनता मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागली, हीच माझी आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. फेसबुक लाईव्हमधून मी महाराष्ट्राच्या जनतेच्या घरात पोहोचलो, नागरिकांना धीर मिळाला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसेच कोरोना काळातील घोटाळा आणि आरोपांवरील टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. हा व्हायरस आहे, तो व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सभागृहातच टोला लगावला.