नागरिकत्व सुधारणा कायदा सावरकरांच्या तत्वांविरोधात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सावरकरांवरून आम्हाला जाब विचारणाऱ्यांनी आधी सावरकरांच्या तत्वांविरोधातील नागरिकत्व विधेयक कायदा का आणला? याचे उत्तर द्यावे. केंद्र सरकारने नको त्या गोष्टी उकरून काढून देशातील मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा डाव आखला आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबाबतची भूमिका शिवसेनेने कालच स्पष्ट केली आहे. सावरकरांबाबतची आमची भूमिका कायमच असून त्यात बदल होणार नाही. सावरकरांनी सिंधू नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंत हा देश एकसंघ राहील अशी भूमिका मांडली होती. तुम्ही सावरकरांना मानता मग पाच वर्षात देश एकसंघ करण्यासाठी काय केले? इतर देशातील पीडित अल्पसंख्याकांना भारतात बोलवून त्यांना तुम्ही असुरक्षितच करत आहात. हा सावरकरांच्या विचारांशी द्रोह नाही का?, असा सवाल ठाकरे यांनी विचारला.

इतर देशातील पीडितांना भारतात आणण्यापेक्षा पीडित अल्पसंख्याकांचा छळ करणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला सक्त ताकीद देण्याची हिंमत का दाखवली नाही? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला आहे. एका झटक्यात नागरिकत्व कायदाचा निर्णय घेणारे सावरकरांना भारतरत्न देण्याचा निर्णय का घेत नाहीत? असा सवालही त्यांनी केला. तसेच नागरिकत्व कायद्यावरही आपले मत व्यक्त केले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/