मंदिर खुली करण्यावर मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका !

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमध्ये धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. आता धार्मिक स्थळे उघडण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर येथील कोविड उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी यावर भाष्य केले आहे.

अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरु केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे. धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत मात्र त्यांनी थेट उत्तर दिले नाही. त्यामुळे राज्यात धार्मिक स्थळे केव्हा सुरू होणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल पण कायमस्वरूपी चेहर्‍याला मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाला सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा आपल्यासाठी कसोटीचा काळ असल्याचे ठाकरे यांनी सांगितले आहे.