अनधिकृत इमारती अधिकृत होणार ? CM ठाकरेंनी दिले मोठ्या निर्णयाचे ‘संकेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाण्यातील किसननगर येथे देशातील पहिल्या नागरी समूह विकास योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी इमारती अनधिकृत आहेत. पण त्यामध्ये राहणाऱ्या माणसांची मतं अधिकृत आहे. त्या इमारतीमधील माणसांची मतं अधिकृत असतील तर मग त्या इमारती अनधिकृत कशा, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनधिकृत इमारती अधिकृत करण्याच्या मोठ्या निर्णयाचे संकेत दिले आहेत.

ठाण्यातील किसननगर येथील कार्य़क्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते. ठाणे शहरातील क्लस्टर प्रकल्पाच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील किसननगर येथील योजनेतील अडथळे आणि आराखड्यांना अंतिम मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया महापालिककडून सुरु होती. मंगळवारी राज्य शासनाने आराखड्यांना अंतिम मंजुरी दिल्याने ही योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला.

तीन विचारांचं सरकार देशाला एक दिशा दाखवतंय त्याचा मला अभिमान असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजन कार्यक्रमानंतर म्हटले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात देशाला दिशा दाखवतो. तसेच महाविकास आघाडीचे हे सरकार राष्ट्राला दिशा दाखवत असून राजकारणाची दिशा ठरवत आहे. तसेच ठाण्यातला हा क्लस्टर प्रकल्प देशातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे मुंबई, ठाणे नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच ठाणे दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध प्रकल्पांचे लोकार्पण तसेच उद्घाटन केले.