नियम मोडणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बुधवारी रात्री ८ वाजेपासून राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’मधील निर्बंधांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत गाफिल राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. संचारबंदीचे पालन योग्यरीतीने व्हावे यासाठी राज्यात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनी रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळावा हे सांगताना ऑक्सिजन सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा हे सांगितले. एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले.