CM उद्धव ठाकरें’नी भाजपवर साधला ‘निशाणा’, म्हणाले -‘कोरोना’वर ‘राजकारण’ करू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता कोरोना विषाणूवर राजकारण करू नका असा सल्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला. उद्धव ठाकरेंचे सरकार कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपचे ‘महाराष्ट्र वाचवा’ आंदोलन सुरु झाले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपवर कोरोना विषाणूवर राजकारण करीत असल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे सरकारसमवेत असलेल्या कॉंग्रेसने या अभियानाला ‘भाजपा बचाओ आंदोलन’ असे संबोधले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाला मी अशी विनंती करतो की या कठीण काळास राजकीय मुद्दा बनवू नये, मला सध्या राजकारणाचा खेळ नको आहे. आम्ही सध्या आमच्या निःस्वार्थ जबाबदार्‍या पार पाडत आहोत आणि महाराष्ट्रातील जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले की प्रत्येकाने आपल्या घरातच ईद साजरी करावी आणि कोविड-19 विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत एकमेकांना सहकार्य करावे. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या 47,000 च्या पुढे पोहोचली आहे, तर 1600 हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज सकाळी नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी मी बोललो आणि आम्हाला तयारीसाठी थोडा वेळ द्यावा अशी विनंती केली. 31 मे पर्यंत लॉकडाऊन संपेल असे आपण म्हणू शकत नाही परंतु आपण कसे पुढे जावे याचा आपल्याला विचार करावा लागेल. येणारी वेळ ही खूप महत्वाची आहे कारण विषाणू वेगाने वाढत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सांगितले की आम्ही अतिरिक्त आरोग्य सुविधेसह तयार आहोत म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. पावसाळ्याचा हंगाम येत आहे, त्यामुळे संबंधित आजार देखील असतील. म्हणूनच, आपण अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.