‘मी पुन्हा येईन’वरुन CM उद्धव ठाकरेंचा Ex CM फडणवीसांना ‘चिमटा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना चिमटा काढत म्हटले की, मी इथं येईन असं कधीच म्हटलं नव्हतं. पण आयुष्य म्हणजे रंगभूमी आहे. इथं कधी कोणाला कोणती भूमिका करावी लागेल सांगता येत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ वरुन चिमटा काढला. तसेच उद्धव ठाकरे म्हटले की यापुढे विरोधी पक्षच अस्तित्वात राहणार नाही, असं मी म्हणेन. कारण विरोधकदेखील माझे मित्र आहेत. माझी आणि त्यांची मैत्री फार जुनी आहे. ती यापुढेही कायमस्वरूपी राहील.

दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा झाली. यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन देखील केलं आहे. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी करत फडणवीसांना धारेवर धरले. ‘मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मी असा पहिलाच मुख्यमंत्री आहे, ज्याच्या समोरचा विरोधी पक्ष त्याचा ३० वर्ष जुना मित्र आहे आणि सोबत असलेले सहकारी हे आतापर्यंतचे राजकीय विरोधक आहेत. विरोधी पक्षात बसलेल्यांना मी विरोधक समजत नाही. कारण ते माझे मित्रच आहेत. तुमच्यासोबतची मैत्री मी कधीही लपवली नाही आणि यापुढेही लपवणार नाही,’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.

काल मी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काय बोललो, असा प्रश्न खूप लोकांना पडला असून त्याबद्दल प्रचंड गवगवा देखील झाला. मात्र बंद दाराआड आणि कानात काय बोललो ते सांगण्याची आमची संस्कृती नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना देखील टोला लगावला. तसेच विरोधी पक्ष नेते म्हणून सरकारला सहकार्य कराल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. तुम्ही सोबत असता तर आज मी हा कारभार घरी बसून टीव्हीवर पाहिला असता. मला इथं यावं लागलं नसतं. कारण इथे येईन असं मी कधीच म्हटलं नव्हतं, असा चिमटा उद्धव यांनी काढला.

Visit : Policenama.com