सरकारी नोकरदारांसाठी खुशखबर ! होणार 5 दिवसांचा आठवडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारी कर्मच्याऱ्यांना ठाकरे सरकारकडून आनंदाची बातमी आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या दृष्टीने विचार करत आहेत. या संदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासांघाच्या विविध मागण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात केंद्राप्रमाणेच पाच दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे आलेला प्रस्ताव अंमलात आणण्यासाठी सरकार विचारधीन असून 45 मिनिटे वाढवून पाच दिवसांचा आठवडा करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत म्हटले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय विचारधीन असताना यामध्ये अत्यावश्यक सेवांसाठी मात्र पाच दिवसांचा आठवडा नसले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत शासन स्तरावर फडणवीस सरकार सत्तेत होते तेव्हापासून हालचाली सुरु आहे. सरकारी कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा आणि निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्षे करण्यात यावे, अशी राज्य शासकिय अधिकारी आणि कर्मचारी संघटनांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. पाच दिवसांचा आठवडा केल्याने दोन दिवस कार्यालये बंद राहतील. त्यामुळे वीज-पाणी आणि इंधन तसेच अतिरिक्त काम यावरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणं आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचा अहवाल पुढील दीड महिन्यांच्या आत सादर केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. या बरोबरच महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबतही सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे कुंटे यांनी सांगितले.