‘घाईगडबडीनं कोणताही निर्णय घेणार नाही’, ओल्या दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यातील कोरोनाचं संकंट संपत नाही तेच अतिवृष्टीचं संकट आलं आहे. सोलापूर, मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. काही दिवसांमध्ये आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे,. त्यामुळं घाईगडबडीनं कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरमधील अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “या दौऱ्यात नुकसानीची पाहणी केली. त्याआधीही प्रशासनाच्या संपर्कात होतो. अवकाळी पावसामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. काही दिवस आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ही आपत्ती मोठी आहे. पीडितांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. जे जे काही शक्य असेल ती सर्व मदत केली जाईल” असं आश्वासनही ठाकरेंनी यावेळी दिलं.

सीएम ठाकरे पुढे म्हणाले, “पचनामे सुरू आहेत. आढावा घेऊन मदत केली जाणार आहे. तुर्तास मृतांच्या नातेवाईकांना आज प्रातिनिधीक मदत दिली आहे. आतापर्यंत मागील सरकारकडून फक्त घोषणाबाजी करण्यात आली आहे. परंतु आम्ही कोणतीही घोषणाबाजी करणार नाही. थेट मदत पुरवणार आहोत.”

हे संकट अजून टळलेलं नाही. येत्या काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळं घाईगडबडीनं काही केलं जाणार नाही. सर्वांची काळजी घेण्याची गरज आहे असंही ते म्हणाले.

सीएम ठाकरे असंही म्हणाले की, पंतप्रधान मोदींसोबत माझं फोनवर बोलणं झालं आहे. त्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळं पंचनामे झाल्यानंतर मदतीची आवश्यकता वाटली तर हक्कानं केंद्राकडे मदत मागणार”

कुणीही राजकीय चिखलफेक करण्याची गरज नाही. सध्या महाराष्ट्रावर मोठं संकट कोसळलं आहे. परंतु विरोधी पक्षनेते हे बिहारला प्रचाराला जात आहेत आपल्या राज्यात काय घडत हे पाहून एकत्र येण्याची गरज आहे. जर केंद्राकडे काही मागायचं असेल तर त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असही ठाकरेंनी सांगितलं.