‘या’ प्रकल्पाबाबत CM ठाकरे यांनी केली मोठी घोषणा, स्वत: केली पाहणी

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन –   आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना (Koyana Power Project) विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी गुरुवारी (दि. 10) व्यक्त केला.

हेळवाक जवळील देशमुखवाडी येथे कोयना जलविद्युत प्रकल्पाचा चौथा टप्पा तयार केला आहे. त्याची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीही केली होती. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन व संसदीय कार्य अनिल परब, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (गृह) शंभूराजे देसाई, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे उपस्थित होते.

कोयना विद्युत प्रकल्पाचा चौथा टप्पा हा सह्याद्री डोंगराच्या पोटात 300 मीटर खोलीवर आहे. या टप्प्यातून लेक टॅपिंग पध्द्तीने 1000 MW (मेगावॉट) वीज निर्मिती केली जाते. जलविद्युत केंद्राच्या पाहणीच्यावेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले. पाहणी वेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून माहिती करून घेतल्या. कोयना जलविद्युत प्रकल्प हा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून 1920 MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या कंपनीच्या विद्यमाने चालविला जातो.

भुयारी बोगदा, मिसिंग लींक कामाची मुख्यमंत्र्यानी केली पाहणी

दरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील लोणावळा कुसगाव येथून सुरू होणाऱ्या भुयारी बोगद्याच्या तसेच मिसिंग लींक या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगर विकास तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ऊर्जामंत्री नितीन राऊत सुद्धा होते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घाट माथ्यावरील होणारी दैनंदिन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच मुंबई-पुणे हे अंतर कमी करण्यासाठी मिसिंग लिंक या नवीन रस्त्यांची निर्मिती रस्ते विकास महामंडळाकडून सुरू केली आहे. या दरम्यान महामार्गावर दोन मोठ्या भुयारी मार्गाचे काम सध्या सुरू असून गुरुवारी मुख्यमंत्र्यांकडून या कामाचा पाहणी आढावा घेण्यात आला.