नियमांचं उल्लंघन केल्यास उध्दव ठाकरे जवळच्या व्यक्तीला देखील सोडत नाहीत – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन पोहरादेवी येथे गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. यावेळी संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले. तर संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर मुख्यमंत्री आणि शरद पवार नाराज आहेत का, याबाबत बोलण्यास राऊत यांनी नकार दिला. यावेळी संजय राऊत यांना पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले. पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

यावेळी प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्र्यांना भेटणार का?, असा सवाल विचारल्यावर वेळ मारुन नेत मी कॅबीनेट बैठकीसाठी चाललोय, असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. माझं रितसर काम सुरु झालंय. तसंच माझ्या शासकीय कामांनाही मी सुरुवात करतोय. त्याच अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीसाठी मी मुंबईला रवाना होत असल्याचे त्यांनी सांगितले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आणि पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आज वनमंत्री संजय राठोड मुंबईच्या दिशेने कॅबीनेट बैठकीसाठी रवाना झाले आहेत.

कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत अनेक बातम्या माध्यमात आल्या आहेत. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.