औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज करा, CM ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राज्यातील वातावरण तापल आहे. शिवसेनेने पूर्वी पासूनच औरंगाबादचे नामांतरण करुन संभाजीनगर करण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान आता औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे पत्र केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना लिहील्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महराज विमानतळ असे करण्याची अधिसूचना नागरी उड्डाण मंत्रालयाने लवकरात लवकर काढावी, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरुन वाद
राज्यात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्दा चर्चेत आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतरण करुन संभाजीनगर करण्याची मागणी लावून धरली आहे. तर शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने याला विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरणाला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याच्या विषयावर आमचा विश्वास नाही, असे थोरात यांनी म्हटले आहे.