मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्यापासून राज्य मंत्रिमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सुरू होत असून राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. आक्रमक झालेल्या भाजपाने अधिवेशनात महाविकास आघाडी सरकाला घेरण्याची सर्व तयारी केल्याचे दिसून आले. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेत योग्य वेळ साधली आहे.

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची पहिली यादी उद्या जाहीर करण्यात येणार आहे. कर्जमूक्ती संदर्भात राज्यातील 35 लाख शेतकर्‍याची माहिती आमच्याकडे आहे. 20 हजार शेतकर्‍यांची खाती असणार आहेत. हीच यादी उद्या जाहीर केली जाईल. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकर्‍यांची यादी जाहीर केली जाईल. तीन महिन्यात टप्प्याटप्याने कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारवर सतत आरोप करणे म्हणजे विरोधी पक्ष नव्हे, सरकारच्या चांगल्या कामांचे कौतूक करायला देखील शिकले पाहिजे. विरोधकांच्या सर्वच प्रश्नांना मी उत्तर देत नाही. विरोधाला विरोध करू नये, या सरकारचे हे पहिलेच मोठे अधिवेशन असून सरकार आता स्थिरावले आहे, हेच विरोधकांच्या पचनी पडत नाही, असे म्हणत ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला.