‘कोरोना’तून बरे झालेल्या रुग्णांना CM ठाकरेंनी केली ‘ही’ कळकळीची ‘विनंती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) दुपारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना म्हणाले, अगोदर कोरोना, नंतर निसर्ग चक्रीवादळ यामुळे राज्याचे मोठं नुकसान झालं आहे. मात्र शासनाने चांगले काम केले, मनुष्यहानी कमी करण्याचे प्रयत्न केले. तसेच राज्यातील अनलॉकबाबत आणि इतर गोष्टींवर त्यानी आपल्या भाषणात भाष्य केलं. या दरम्यान त्यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना एक कळकळीची विनंती केली आहे.

जसं रक्तदान करतो, तसं प्लाझ्माही दान करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना केलं आहे. प्लाझ्मा पद्धती आपण मार्च-एप्रिलपासून सुरु केली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाज्माच्या मदतीनं 90 टक्के कोरोना रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी पुढे याव आणि प्लाज्मा दान करावा, असे आवाहन त्यांनी केलं आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जगभरात प्लाज्मा उपचार पद्धतीचा वापर होत आहे. राज्यातही सध्या या पद्धतीचा अतिशय व्यापकपणे वापर सुरु केला आहे. कदाचित महाराष्ट्र प्लाज्मा पद्धतीचा सर्वाधिक वापर करणारं राज्य ठरेल. मात्र, यासाठी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रक्तदानाच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला. कोरोना संकट येताच सुरुवातीला मी रक्तदान करण्याचे आवाहन केलं होतं. त्याला राज्यातील जनतेने मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे रक्ताचा तुटवडा दूर झाला. त्याच प्रमाणे प्लाज्मा दान करण्याच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.