‘गतवर्षी हेक्टरी 25 हजारांची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता मदत जाहीर करावी’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –   स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ (Wet drought) जाहीर करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. आता पाहणी बस करा. मुख्यमंत्री आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी तत्काळ मदतीची घोषणा करायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले, “शेतकऱ्यांचं न भरून येणारं नुकसान झालं आहे. शेतातील पिकांसह माती आणि जनावरंही पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. शेतातील विहिरी मातीनं भरून गेल्या आहेत. विहिरींवरील मोटारीही पाण्यात अन् मातीत बुजल्या आहेत. त्यामुळं शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शेतकऱ्याच्या बांधापर्यंतही नीट जाता येत नाही. त्यामुळं पंचनामे करण्याची ही वेळ नसून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा.” अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुढं शेट्टी म्हणाले, “मुख्यमंत्री आज उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी मदतीची घोषणा करावी. उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होण्याआधी मागील वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. आता तर ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी. केंद्र सरकारनंही (Central government)हात झटकून चालणार नाही. सरकरानं वेळीच मदत न केल्यास स्वाभिमानी संघटना रस्त्यावर उतरून लढाई लढेल.” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, “नुकसानीच्या पाहणीचे नुसते दौरे नको. राज्य आणि केंद्र सरकारनं तातडीनं महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि मदत द्यावी. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय पातळीवर आपत्ती निवारण फंड तयार करावा. सध्या या अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकऱ्यांचं जवळपास 50 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्य सरकारनं तातडीनं महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून 15 हजार कोटी रुपये व केंद्र सराकरनं केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून 35 हजार कोटी रुपयांची भरपाई द्यावी.” असंही ते म्हणाले.

You might also like