राम भक्तांवर गोळ्या झाडणारेच आज समाजकंटकांवरील कारवाईचं उत्तर मागतायेत : मुख्यमंत्री योगी

लखनऊ : वृत्तसंस्था – सभागृहात झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी आज (बुधवार) धन्यवाद प्रस्ताव मांडत विरोधी पक्षांवर टीका केली. सीएएच्या निषेधावेळी झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. याला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, राम भक्तांवर गोळीबार करणारेच कारवाईची मागणी करत आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

योगी आदित्यानाथ अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, विरोधकांकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली जात आहे. अयोध्या प्रकरणावर न्यायालयाचा निकाल आल्यानंतर हे सिद्ध झाले की रामभक्तांची मागणी योग्य होती आणि त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांची चूक होती. सीएएच्या विरोधात आंदोलने करणाऱ्यांना योगींनी सुनावले. आझादीचे नारे देण्यात येत आहेत. काय आहे आझादी. आपल्याला जिनांची स्वप्न पूर्ण करायची आहेत की गांधीजींची ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सीएए विरोधात आंदोलनं झाली. काही ठिकाणी आंदोलनाना हिंसक वळण लागलं. सीएएविरोधी हिंसेत 22 जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या गोळीने कुणाचाही मृत्यू झाला नाही. दंगल घडवणाऱ्यांच्या गोळ्या लागूनच सर्वांचा मृत्यू झालाय. लोकांना निशाणा बनवण्यासाठी रस्त्यावर उतरणारे एक तर स्वत: मरतो किंवा मग पोलीस ठार होतात, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभेला संबोधित करताना म्हणाले.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, रामभक्तांवर गोळ्या चालवायच्या आणि दहशतवाद्यांचे गुन्हे मागे घ्यायचे. सीएएला विरोध का केला जात आहे ? सत्तेपेक्षा आपला देश मोठा आहे. सत्ता आमच्यासाठी फक्त एक साधन आहे. आमच्या राजवटीत एकही दंगल घडली नव्हती. पोलिसांच्या गोळीमुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. देशाचे वातावरण बिघडवणाऱ्यांच्या मागे विरोधी पक्ष उभा राहत आहे. मात्र, तिरंग्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नाही, असे योगींनी सांगितले.