ड्रायव्हरसह सहकाऱ्यांना दिले २० कोटींचे शेअर्स भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या सहकाऱ्याविषयी अनेक जण कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्यामुळे मी आज या पदापर्यंत पोहचू शकलो, असे आवर्जुन सांगतात. पण त्यात प्रत्यक्ष कृतीचा भाग फार कमी असतो. कॅपिटल फर्स्ट या कंपनीचे अध्यक्ष व्ही. वैद्यनाथन यांनी आपल्या सहकाऱ्यांविषयी केवळ शाब्दीक कृतज्ञता व्यक्त न करता त्याला कृतीची जोड दिली आहे. २०१० साली स्थापन केलेल्या या कंपनीने अल्पावधीत मोठी गरुड भरारी घेतली. कॅपिटल फर्स्ट या कंपनीचे अध्यक्ष व्ही. वैद्यनाथन यांनी कंपनीला मोठे करण्यासाठी मेहनत घेतलेल्या आपल्या सहकाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना चक्क २० कोटी रुपयांचे शेअर्स भेट म्हणून दिले आहेत. कॅपिटल फर्स्टच्या एका शेअरचा भाव शुक्रवारी ४८० रुपयांचा आसपास होता. ही कंपनी लवकरच आयडीएफसी बँकेत विलिन होत आहे. २०१० मध्ये ही कंपनी स्थापन केल्यापासून तिला आत्ता यशाच्या शिखरावर आणण्यासाठी ज्या ज्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली, त्या सगळ्यांची नावे कृतज्ञतापूर्वक नोंदवत, त्यांना आपण हे शेअर्स भेट देत असल्याचे वैद्यनाथन यांनी बाँबे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे.

वैद्यनाथन यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे ४० लाखाहून अधिक शेअर्स आहे. यातील तब्बल २० कोटी रुपयांचे  ४ लाख २९ हजार शेअर्स  त्यांनी आपले २६ सहकारी, ११ नातेवाईक व एक वैयक्तिक ड्रायव्हर यांना भेट दिले आहेत. या सहकाऱ्यामध्ये तीन जण तर माजी आहेत, म्हणजे जे आत्ता त्यांच्यासोबत काम करत नाहीत. या सर्व सहकाऱ्याना वैद्यनाथन यांनी स्वत:च्या मालकीचे प्रत्येकी ११ हजार शेअर्स (ज्यांची आजची किंमत सुमारे ५३ लाख रुपये आहे) भेट दिले आहेत. आपल्या कंपनीला मोठं करण्यात ज्यांनी हातभार लावला त्यामध्ये गणती करताना वैद्यनाथन स्वत:च्या व्यक्तिगत ड्रायव्हरला व घरकाम करणाऱ्यानाही देखील विसरले नाहीत. त्यांनी ड्रायव्हरलाही ६ हजार ५०० म्हणजे सुमारे ३१ लाख रुपयांचे शेअर भेट दिले आहेत. माजी सहकाऱ्याबद्दल त्यांनी म्हटलंय की भलेही ते आता कंपनीत नसतील, परंतु कंपनी सोडण्याआधी त्यांनी जे योगदान दिले  व कंपनीच्या वाढीसाठी त्यांनी जे परीश्रम घेतले ते विसरता येणार नाहीत.

सतीश गायकवाड या कॅपिटल फर्स्टच्या कंपनी सेक्रेटरींनी लिहिलेल्या पत्रात हे नमूद केलंय की, केवळ प्रेम व कृतज्ञतेपोटी ही भेट देण्यात येत असून कुठल्याही प्रकारचं करनियोजन नाहीये. वैद्यनाथन यांनी ज्या नातेवाईकांना शेअर्स भेट दिलेत, त्यामध्येही त्यांच्या वारशांचा समावेश नाही. भाऊ, बहीण, मेहुणी, पत्नीचे काका-मामा आदींचा समावेश आहे. आपण गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या कामाची कंपनीचा अध्यक्ष अशी दखल घेताना बघून या सगळ्या सहकाऱ्यांना नक्कीच समाधान व दिवाळीत अनपेक्षित लाभ मिळाल्याचा आनंद झाला असेल यात शंका नाही.

जाहिरात