Co-Win Vaccinator App : सर्वसामान्यांसाठी नाही कोविन अ‍ॅप, सरकारने सांगितले – ‘जर लस घ्यायची असेल तर इथं करा रजिस्ट्रेशन’

नवी दिल्ली : भारत सरकारच्या कोविन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करून कोरोना लस घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी म्हटले की, प्ले स्टोरवर उपलब्ध कोविन अ‍ॅप केवळ प्रशासनाच्या वापरासाठी आहे. तुम्हाला कोविड-19 ची लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

वरिष्ठ नागरिकांसाठी आणि इतर रोगांनी ग्रस्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी कालपासून देशव्यापी लसीकरण अभियान सुरू झाले आहे. नोंदणीकरणात लोकांना अडचणी येऊ लागल्यानंतर मंत्रालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने ट्विट करून म्हटले की, कोविड-19 लसीकरणासाठी केवळ कोविन पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केली जाऊ शकते. लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी कोणतेही कोविन अ‍ॅप नाही. प्ले स्टोरवर उपलब्ध अ‍ॅप केवळ प्रशासनासाठी आहे. सरकारच्या सांगण्याचे अर्थ हा आहे की, जर सर्वसामान्यांना कोरोना व्हॅक्सीन घ्यायची असेल तर त्यांना को-विन वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. यासाठी https://www.cowin.gov.in/home येथे क्लिक करू शकता.