कोकेनची तस्करी, ३९ कोटीचे कोकेन जप्त

अंबोली (मुंबई) : पोलीसनामा ऑनलाईन – घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या पडद्यामधून कोकेनची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या नायजेरियन टोळीला अटक करुन ३८ कोटी ९५ लाख ९७ हजार ६०० रुपये किंमतीचे  ६ किलो ४९२ ग्रॅम वजनाचे कोकेन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई आज (रविवार) सकाळी दहाच्या सुमारास अंधेरी पश्चिम येथील मौर्या इस्टेट रोडवर करण्यात आली.

निरस अझुबिक ओखोवो (वय-३५), सायमन अगोबता (वय-२३), मायकल संदे होप (वय-१९), कार्ले पिन्टो आयरिस असे अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहे.कार्ले आयरिस ही महिला ब्राझील देशाची रहिवाशी आहे. तर इतर नायाझेरियाचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांना शनिवारी (दि.९) ठाणे हद्दीत अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी काही नायजेरियन येणार असल्याची माहिती मिळाली. अंमली पदार्थ घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या पडद्यामधून आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने आज सकाळी अंधेरी पश्चिम येथील मौर्या इस्टेट रोडवर सापळा रचला. त्यावेळी संशयास्पद हालचालीवरुन चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे घरांना व खिडक्यांना लावण्याच्या कापडी पडद्यांना लावलेल्या धातुच्या रिंगमध्ये, किनारीसाठी वापरल्या जाणाऱ्या रिबीनच्या खाली गुंडाळुन ठेवलेल्या प्लास्टीकच्या पिशवीमध्ये कोकेन हा अंमली पदार्थ आढळून आला.

तस्करी करणाऱ्यांची वेगळी शक्कल
अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी घरात वापरण्यात येणाऱ्या पडद्यांचा वापर करण्यात आला. कोणालाही संशय येऊ नये यासाठी तस्करांनी ही वेगळी शक्कल लढवल्याने पोलीस देखील चक्रावून गेले. अशा प्रकारे अंमली पदार्थाची तस्करी करण्याची पहिलीच वेळ असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या तस्करांच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये मोठ्या प्रमाणात कापडी पडदे, पुठ्ठ्याचे रिळ, रिबीन्स, धातुच्या रिंगा व त्या रिंगा प्रेस करण्यासाठी वापरले जाणारे मशीन, नायलॉनच्या नळ्या, तीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे जप्त करण्यात आले.

अंमली पदार्थाच्या तस्करीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली महिला आरोपी ही काही महिने भायखळा कारागृहात होती. ती काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटली आहे. तर इतर आरोपी हे जामिनावर असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई सह पोलीस आयुक्त देवेन भारती, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग मनोजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या देखरेखीकाली अंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद नायक, पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक गोपाळे, गजानन सरगर, सहायक पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उप निरीक्षक विजय गायकवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक फडतरे, सहायक फौजदार सावंत, पोलीस हवालदार नादीर, पोलीस नाईक बोमटे, चव्हाण, राणे, पवार, पोलीस शिपाई साळवी, डांगे, पाटील, पाडेकर यांच्या पथकाने केली.