आग्रीपाडा येथून 1.5 कोटीचे अंमलीपदार्थ जप्त, परदेशी आरोपीला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   अंमली पदार्थाची तस्करी करणा-या एका परदेशी इसमास अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 500 ग्रॅम वजनाचे दीड कोटीचे कोकेन जप्त केले आहे. मंगळवारी (दि. 23) मध्यरात्री आग्रीपाडा येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने ही कारवाई केली आहे.

चिकुएमेका इमान्युअल एनवॉन्को (वय 35 रा. जुईनगर, नवी मुंबई, मूळ नायजेरिया ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिटचे पोलीस निरीक्षक मसवेकर यांना एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी चिकुएमेका इमान्युअल एनवॉन्कोला अटक केली. त्याची झडती घेतली असता 500 ग्रॅम वजनाचा कोकेन मिळून आला. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो मूळ नायजेरिया येथील असून तो सध्या नवी मुंबईतील जुईनगर येथे राहतो. तो तेथे कपड्याचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांना त्याने तपासात सांगितले. हा आरोपी अमली पदार्थ खरेदी विक्री करीत असून त्याची एक मोठी टोळी असल्याची शक्यता असून त्याचा आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आहे.