कमळाचे चित्र असलेली साडी नेसून मतदान करणे ‘या’ महापौराला पडले महागात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – कमळाचे चित्र असलेली साडी नेसून मतदान करण्यासाठी जाणे सांगलीच्या महापौर संगीता खोत यांना महागात पडलं आहे. कमळाचे चित्र असलेली साडी नेसून मतदान केंद्रावर आल्याने त्यांच्याविरोधात महात्मा गांधी पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉंग्रेस नेते अय्याज नायकवडी यांनी याप्रकरणी आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्याचे पुरावे सादर केले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्य़ा टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी पार पडले. तिसऱ्या टप्प्यात सांगली लोकसभा मतदारसंघातही मतदान प्रक्रिया सुरु होती. महापौर संगीता खोत या माणिक नगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कमळाचे चित्र असलेली साडी नेसली होती. त्यांनी कमळाचे चित्र असलेली साडी नेसून भाजपचा प्रचार केला असल्याचा आक्षेप घेत कॉंग्रेसचे नेते अय्याज नायकवडी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. दरम्यान निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत महात्मा गांधीनगर पोलीस ठाण्यात महापौर संगीता खोत यांच्याविरोधात आचरसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.