घराच्या बाथरुममध्ये आढळला विषारी साप, 35 पिल्लांना दिला जन्म

कोईम्बतूर : वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोईम्बतूरच्या कोविमेडू नावाच्या एका गावातील एका घरातील बाथरुममध्ये अतिशय विषारी समजला जाणारा रसेल्स वायपर जातीचा साप आढळून आला हा साप बाथरुममध्ये सापडल्याने घरातील लोक घाबले. त्यांनी सर्पमित्राला बाथरुमध्ये साप असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्राने त्या ठिकाणी येऊन साप ताब्यात घेतला. त्यावेळी जे घडले ते पाहून सर्वच लोक दंग राहिले.

कोविडमेडूचे रहिवासी असलेल्या मनोहरन यांना आपल्या घराच्या बाथरुमध्ये एक मोठा साप दिसला. हे पाहून ते पहिल्यांदा खूप घाबरले पण त्यांनी तात्काळ याची माहिती मुरली नावाच्या सर्पमित्राला दिली. मुरली याला ताबडतोब घरी येऊन साप घेऊन जाण्यास सांगितले. मुरली साप पकडण्यासाठी घरी आला तेव्हा त्याला समजले की, हा साप अत्यंत विषारी रसेल्स वायपर जातीचा साप आहे.

मुरलीनं जंगलात सोडून देण्यासाठी सापाला ताब्यात घेऊन एका पोतडीत बंद केले. परंतु काही वेळातच मादी सापानं पिल्लांना जन्म देत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने हातातील पोतडी एका झाडाखाली ठेवली. दोन तासानंतर या पोतडीत 35 लहान सापांनी जन्म घेतल्याचे पहायला मिळाले. या सर्व सापांना इरोड जिल्ह्यातील सत्यमंगलमच्या जंगलात सोडण्यात येणार आहे.
सामान्यत: साप अंडी देतात त्यानंतर अंडी उबवल्यानंतर त्यातून सापाची पिल्लं बाहेर पडतात. परंतु रसेल्स वायपर साप शरीरातच अड्यांना उबवून पिल्लांना जन्म देतात. रसेल्स वायपर सापाने एखाद्या व्यक्तीचा चावा घेतला तर त्याचा काही वेळातच मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो.