राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी सुरु आहे. उत्तर भारतातही अनेक ठिकाणी गारपीट होत आहे. त्यामुळे तापमानात घट झाली असून त्याचा परिणाम राज्यातील किमान तापमानात घट झाली असून थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे.

पुण्यात शुक्रवारी सकाळी सर्वात कमी १०.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. कोकण, मुंबईतही फेब्रुवारीत थंडीचा कडाका अनुभवायला येत आहे.

हिमाचल पर्वत रांगांमध्ये होत असलेली प्रचंड बर्फवृष्टी आणि जम्मू, काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे काश्मीरचा देशाशी संपर्क तुटला आहे. उत्तर भारतातही अनेक ठिकाणी पाऊस व गारपीट होत आहे. त्यामुळ उत्तरेकडून येणाऱ्या थंड व बोचऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात पुन्हा घट झाली आहे. नाशिक, मालेगाव, अहमदनगर, पुणे या मध्य महाराष्ट्राच्या पट्ट्यात त्याचा अधिक परिणाम दिसून येत आहे.

पुणे शहरात गुरुवारी सकाळी १०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात शुक्रवारी आणखी घट होऊन ते १०.२ अंश सेल्सिअसवर आले. बुधवारी पुण्यातील किमान तापमान १३़४ अंश सेल्सिअस इतके होते. त्यात गुरुवारी तब्बल ३ अंशांनी एकाच दिवशी घट झाली होती. आणखी दोन दिवस ही लाट राहण्याची शक्यता आहे.

नाशिक येथेही शुक्रवारी १३़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुलढाणा येथे १२ अंश, बीड १४.८ अंश, महाबळेश्वर १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद शुक्रवारी झाली आहे.