‘बाहेर पडलीय थंडी, घालून बसा बंडी’, गृहमंत्र्यांकडून आठवलेंना खास आठवले स्टाईल शुभेच्छा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale) यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे, देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यापांसून ते दिग्गज नेतेमंडळींनीही त्यांना 61 व्या (61st birthday) व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियात त्यांच्या कविताही शेअर केल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ( Home Minister Anil Deshmukh) यांनीही आठवलेंना खास आठवले स्टाईल शुभेच्छा दिल्या आहेत.

आठवलेंचा केंद्रीयमंत्री पदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, एक सर्वसामान्य चळवळीतील कार्यकर्ता ते केंद्रीयमंत्री असा संघर्षमय प्रवास आठवलेंनी केला आहे. दलित पॅंथर चळवळीच्या काळात त्यांची ‘सर्वांना सोबत घेऊन जाणारा’, ‘राज्यभर फिरणारा’ आणि ‘एक खंदा कार्यकर्ता’, अशी ओळख निर्माण झाली होती. कार्यकर्तांची मोट बांधत बांधत त्यांनी आपल्या पाठीमागे मोठा जनाधार उभा केला. पण आधी राष्ट्रवादीसोबत मैत्री आणि मग भारतीय जनता पक्षाबरोबरच हातमिळवणी,अशा राजकीय कोलांट उड्या खाल्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली. मात्र, आपल्या मजेशीर स्वभावामुळे आणि चारोळ्यांमुळे ते गल्लीपासून दिल्लीपर्यत अनेकांचे चाहते बनले आहेत. राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर आज ते केंद्र सरकारमध्ये सामाजिक कल्याण राज्यमंत्री आहेत.

बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग
आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी रामदास आठवलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.