थंडीच्या लाटेचा ‘कहर’ सुरूच, दिल्लीसह उत्तर भारतातील 6 राज्यांमध्ये ‘रेड अ‍ॅलर्ट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर भारतातील अनेक भागात थंडीच्या लाटेमुळे शनिवारी राजधानी दिल्ली आणि शेजारील राज्यांमध्ये किमान तापमान सर्वात कमी पातळीवर पोहचले आहे. दाट धुके पसरल्याने विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर परिणाम झाला आहे. नवीन वर्षापर्यंत थंडीच्या लाटेपासून सुटका मिळणार  नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने रविवारसाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारला रेड कोडेड इशारा जारी केला आहे. रेड कोडेड इशारा हा हवामानाची स्थिती खुपच बिकट असल्यानंतर देण्यात येतो. हवामान विभागानुसार राजधानी दिल्लीतील काही भागात तापमान 2 डिग्री सेल्सियसच्याही खाली गेले होते. लोधी रोड वेधशाळेत हे तापमान 1.4 डिग्री सेल्सियस नोंदविले गेले. 1901 नंतर हे दुसरे सर्वाधिक कमी तापमान आहे.

दिल्लीतील चार विमानांची उड्डाणे खराब हवामानामुळे अन्यत्र वळविण्यात आली. विमानतळ अधिकार्‍याने सांगितले की, पायलटने सीएटी 3 बी स्थितीचा उपयोग केला, याचा अर्थ धावपट्टी दृश्यता 50 ते 175 मीटर दरम्यान आहे. तर रेल्वेच्या अधिकार्‍याने सांगितले की, दाट धुक्यामुळे दृश्यता खराब असल्याने हावड़ा-नवी दिल्ली पूर्वा एक्स्प्रेससह 24 गाड्या दोन ते पाच तास उशीराने धावत आहेत. हरियाणाच्या रेवाडीमध्ये दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर दाट धुक्यामुळे 15 वाहने एकमेकावर आदळली. या अपघातात दोन जणांचा बळी गेला तर 12 जण जखमी झाले आहेत.

हरि याणा आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 5 ते 7 डिग्री कमी नोंदविले गेले. दोन्ही राज्यांमध्ये हिसारमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 0.2 तापमान नोंदविले गेले. पारा आणखी 2 सेल्सियसने उतरल्याने उत्तर प्रदेशातील लोक थंडीने गारठले आहेत. मुजफ्फरनगरमध्ये राज्यातील सर्वात कमी म्हणजे 1.7 डिग्री सेल्सियस तापमान नोंदविले गेले. अलीगढचे तापमान 1.8 डिग्री सेल्सियस नोंदविले गेले.

दिल्लीच्या सफदरजंग वेधशाळेने शनिवार सकाळी किमान तापमान 2.4 डिग्री सेल्सियस नोंदविले. दिल्लीच्या काही भागात तापमान 2 डिग्रीपेक्षाही कमी झाले होते. लोधी वेधशाळेमध्ये 1.7 तापमानाची नोंद झाली आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या अनेक भागात थंडीचा जोर आहे. जलवाहिन्या आणि प्रसिद्ध डल तलाव गोठला आहे. शहरात या हंगामातील सर्वात थंड रात्र म्हणून नोंद झाली आहे. कारण येथे पारा 5.6 डिग्रीपेक्षा खाली आला होता.

हवामान विभागाने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला काश्मीरमध्ये हिमवर्षाव होण्याचा अंदाज वर्तविला आहे. श्रीनगरमध्ये हवामान विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, लडाखमध्ये लेह आणि द्रासमध्ये पारा सातत्याने शून्य ते 19.1 डिग्री सेल्सियस आणि शून्य ते 28.6 डिग्री सेल्सियसच्या खाली नोंदवला गेला आहे.

हिमाचल प्रदेशात कुफरी, मनाली, सोलनमध्ये पारा खुपच खाली आला आहे. राज्यात दिवसाचे सर्वाधिक कमी तापमान केलांगमध्ये शून्य ते 11.5 च्या खाली नोंदवले गेले. 31 डिसेंबरपासून 2 जानेवारीदरम्यान येथे मध्यम आणि उंच पर्वतीय क्षेत्रात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात फतेहपुरमध्ये सर्वात कमी तापमान नोंदविण्यात आले. सीकर आणि माउंट आबूमध्ये तापमान क्रमश: शून्याच्या खाली एक डिग्री सेल्सियस आणि शून्याच्या खाली 1.5 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले.

हवामान विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले की, जयपूरमध्ये पुढील 24 तासात थंडीची लाट कायम राहू शकते. ओडिसाच्या अनेक भागात थंडीची लाट आहे. सोनपूरमध्ये सर्वात कमी 4 डिग्री तापमान नोंदले गेले. हवामान विभागाने अंदज वर्तवला आहे की, ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील. तापमान आणखी खाली येण्याची शक्यता आहे. तर गुजरातच्या कच्छ क्षेत्रात शनीवारी थंडीची लाट होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/