कोरेगाव भीमा विजयस्तंभ मानवंदन : सोशल मीडियावर ठेवणार लक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील वर्षी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमावेळी परिसरात काही समाज कंटकांनी दंगल भडकवली होती. यावर्षी असा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आढावा बैठक घेतली. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१९ ला होणाऱ्या विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम होणार आहे. येथील कार्यक्रमासाठी तसेच बॅनर्ससाठी आता शासनाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून मागील वर्षीचा अनुभव पाहता यासंबंधी सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी घेतलेल्या या बैठकीत परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावर्षी विजयस्तंभ कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा प्रशासन करणार आहे. कोरेगाव भिमा परिसरात सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था यांचे नियोजन जिल्हा प्रशासन करणार असून त्यासाठी अनेक गोष्टींसाठी प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन उपस्थितीत नागरिकांना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम या बैठकीत केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभागाची कामे सुरू करण्यात आली आहेत. कार्यक्रमाला पोलीस विभागाकडून मोठा बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतेही फलक लावता येणार नाहीत. यासंबंधी सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.