पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्याची बुलेटसह दरीत उडी मारून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने बुलेटसह दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा विद्यार्थी वाघोली येथील एका महाविद्यालयात शिकत असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. अपूर्व श्रीकांत गिरमे (वय-19 रा. गोकुळनगर, विमाननगर) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो 20 जानेवारी पासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह मुळशीतील मुठा घाटात आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपूर्व 20 जानेवारीला महाविद्यालयात गेला होता. प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम असल्याचे मित्रांना सांगून तो निघून गेला. तेव्हापासून तो बेपत्ता होता. रात्री घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल बंद लागत होता. वडीलांनी तो बपत्ता असल्याची तक्रार विमाननगर पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता तो बुलेटसह पौडजवळील मुठा घाटात असल्याची माहिती मिळाली. कुटुंबीय आणि पौड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लवटे, पोलीस हवालदार सुनील मगर, बनसोडे, पवार, देवकते यांनी मुठा घाटात त्याचा शोध घेतला. शनिवारी (दि.25) त्याचा शोध घेत असताना बुलेट जळालेल्या अवस्थेत सापडली. तसेच अपूर्वचा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

अपूर्व याने बुलेटसह दरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचा संशय पौड पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पौड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली. हे अद्याप समजू शकले नसून पोलीस त्याच्या आत्महत्येचे कारण शोधत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा