शहिद वडिलांच्या फोटोसमोर स्तब्ध उभी होती 6 वर्षांची चिमुकली

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चीनच्या मुजोरीनंतर प्रत्यक्ष ताबारेषेवर झालेल्या संघर्षात तेलंगणमधील कर्नल संतोष बाबू (37) यांच्यासह 20 भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. कर्नल संतोष बाबू यांच्या मुलीचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शहिद वडिलांच्या फोटोसमोर उभी असलेली सहा वर्षांची चिमुकली पाहून प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.

मुलगा सीमेवर शहीद झाल्याचे समजल्यानंतर संतोष यांचे पालकांना धक्का बसला. वडील बी उपेंद्र (63) आणि आई मंजुळा (58) यांना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास मुलगा शहीद झाल्याचे समजले. आम्ही भारत चीन सीमेवरील लढाई संघर्षाबद्दलच्या बातम्या टीव्हीवरुन पाहत होतो. मात्र शहीदांची नाव टीव्हीवर दाखवण्यात आली नव्हती. त्यामुळे शहीद झालेल्यांमध्ये आमच्या मुलाचा समावेश असेल असे आम्हाला वाटले नव्हते.

मात्र दिल्लीमधून सुनेचा फोन आल्यानंतर आम्हाला या घटनेबद्दल समजले. तो आम्हाला अशाप्रकारे सोडून जाईल असे वाटले नव्हते. मात्र त्याने देशासाठी बलिदान दिल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे उपेंद्र यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच संतोषशी बोलणे झाले होते. त्यावेळी त्याने सप्टेंबरमध्ये परत येईल असे म्हटले होते, अशी आठवणही उपेंद्र यांनी सांगितली. संतोष यांच्या मागे आई-वडील, बहीण, पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे. पत्नी, सहा वर्षाची मुलगी अभिघना आणि चार वर्षांचा मुलगा अनिरुद्ध हे दिल्लीमध्ये राहतात. सध्या सोशल मिडियावर अभिघनाचा फोटो व्हायरल होत आहे.