गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबूंना मिळणार ‘महावीर चक्र’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक संघर्षात आपला प्राण गमावलेल्या कर्नल संतोष बाबू यांना यंदा महावीर चक्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी देशाच्या रक्षणासाठी आपला जीव देणाऱ्या सैनिकांना शौर्य पुरस्कार दिला जातो. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्यात येणार आहे. दरम्यान, परमवीर चक्रानंतर सैन्यात महावीर चक्र हा सर्वात मोठा सन्मान आहे. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत चिनी सैन्याशी लढा देणाऱ्या बर्‍याच सैनिकांना यावेळी शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एएसआय मोहन लाल यांनाही शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मोहन लाल यांनीच आयईडी घेऊन जाणाऱ्या कारची ओळख पटविली आणि बॉम्बरवर गोळीबार केला होता.

गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासह हिंसक संघर्षात शहीद झालेल्या कर्नल बी. संतोष बाबू हे चीनी बाजूने चर्चेचे नेतृत्व करीत होते, परंतु रात्री उशिरा झालेल्या हिंसाचारात ते शहिद झाले. 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष यांच्यासह त्याच दिवशी इतर 19 सैनिक शहीद झाले. या सर्वांनी आपले बलिदान दिले, परंतु चीनला प्रवेश दिला नाही.

20 सैनिक शहीद
लडाख सीमेवर चीनबरोबरच्या भारतीय सैनिकांच्या हिंसक चकमकीत शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबूसमवेत आणखी 19 सैनिक शहीद झाले. यात नायब सुभेदार सतनाम सिंह आणि मनदीप सिंग यांच्यासोबत बिहार रेजिमेंटचे 12, पंजाब रेजिमेंटचे तीन, 81 एमपीएससी रेजिमेंटचे एक आणि 81 फील्ड रेजिमेंटचे एक जवान सामील आहेत.