गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी उप जिल्हाधिकारी बनल्या, मुख्यमंत्री KCR यांनी दिलं नियुक्तीचं पत्र

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत वीरगती प्राप्त झालेले कर्नल संतोष बाबू यांची पत्नी संतोषी यांना तेलंगणा सरकारने उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी कर्नल संतोष बाबू यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन उपजिल्हाधिकारीचे नियुक्ती पत्र त्यांची पत्नी संतोषी यांना दिले.

संतोषी यांची पोस्टिंग फक्त हैदराबाद किंवा आसपासच्या भागात देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना केली. सीएम केसीआर यांनी कर्नल बाबूच्या कुटूंबियांसमवेत भोजन देखील केले.

कर्नल संतोष बाबूची पत्नी संतोषी त्यांची 8 वर्षाची मुलगी आणि 3 वर्षाच्या मुलासमवेत दिल्लीत राहतात. संतोषी यांच्या आई हैदराबादमध्ये राहतात. कर्नल संतोष बाबू यांच्या शहादत वर तेलंगणा सरकारने कर्नल संतोष बाबूच्या कुटूंबाला पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

हैदराबादमध्ये जमीन आणि 5 कोटींची मदत

सीएम केसीआर यांनी हैदराबादच्या बंजारा हिल्समधील 711 यार्ड जागेची कागदपत्रे संतोषीला दिली. मुख्यमंत्र्यांनी संतोषीला चार कोटी आणि कर्नल संतोषच्या पालकांना एक कोटी रुपयांचा धनादेश दिला. याशिवाय ते म्हणाले की जर त्यांना एखाद्या गोष्टीची गरज वाटत असेल तर ते थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधू शकतात.

15 जून रोजी कर्नल संतोष बाबू चीनच्या बेकायदेशीर पोस्टला खाली करण्यासाठी लडाखमधील गलवान खोऱ्यात गेले होते. यावेळी, चिनी सैनिकांनी फसवणूक करून भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात कर्नल संतोष बाबू शहीद झाले होते, चीनबरोबर झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक ठार झाले होते. चीनच्या विश्वासघाताला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या अनेक सैनिकांना ठार केले.