पार्थ पवार आणि भाजप आ. लक्ष्मण जगताप यांच्या एकत्रित फोटोमुळे राजकिय चर्चेला उधाण

योगायोग की आणखी काय याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांची तुकाराम बीज सोहळयाच्या निमित्‍ताने भेट झाली. त्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान पार्थ पवार आणि भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट झाली. कार्यकर्त्यांनी एकत्रित फोटो देखील काढला. आता तो फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. त्यामुळे जगताप आणि पार्थ पवार यांची भेट योगायोगाने झाली की काही राजकिय गणिते आहेत अशी राजकिय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. कारण, सन 2014 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना आव्हान दिले होते. त्यामध्ये बारणे यांचा विजय झाला होता. त्यावेळीची सल अद्यापही जगतापांना आहे. त्यामुळेच एकत्रित फोटोमुळे राजकिय चर्चेला उधाण आले आहे.

पार्थ पवार प्रचारानिमित्‍त पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. त्यांनी शिवजयंतीच्या निमित्‍ताने शहरातील मंडळांच्या भेटी घेतल्या. पिंपळे गुरव येथील एका मंडळाला पार्थ पवार यांनी भेट दिली आणि त्याचवेळी आमदार जगताप तेथे दाखल झाले. दोघेही एकाच वेळी कार्यक्रमस्थळी दाखल झाल्याने उपस्थितांमध्ये थोडा गोंधळ उडाला. उपस्थित कार्यकर्त्यांनी पार्थ पवार आणि लक्ष्मण जगताप यांचे फोटो काढले. त्यामध्ये इतर कार्यकर्ते देखील आहेत. नेमका तोच फोटो व्हायरल झाला असून व्हाटस् अ‍ॅपवर आमदार लक्ष्मण जगताप यांनी पार्थ पवारांना पाठिंबा दिला आहे काय अशी चर्चा रंगली आहे. मात्र, केवळ योगायोगाने आ. जगताप आणि पार्थ पवार एका कार्यक्रमानिमित्‍त एकत्र आले होते ही वस्तुस्थिती आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थायी समितीचे सभापती विलास मडेगिरी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे-पाटील, नगरसेवक नाना काटे आणि दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.