पुणे पोलिसांचे जनता वसाहतमध्ये कोंबिंग ऑपरेशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांचा शोध सुरु केला आहे. आज गुन्हे शाखेने भवानी पेठेतील कासेवाडी आणि पर्वती येथील जनता वसात, दांडेकर पुल परिसरात कोंबिग ऑपरेशन केले. यामध्ये पूर्वीच्या अनेक गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली, तर काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जनता वसाहतीमध्ये टोळी युद्धातून एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी तरुणांकडून कोयत्याने वार करण्याच्या घटना घडल्या होत्या. भर दिवसा रस्त्यावरुन कोयते घेऊन फिरणाऱ्या तरुणांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. या तरुणांमुळे शहरातील कायदा सुवव्यस्थेतेविषयी चर्चा सुरु झाली होती. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे बोलले जात होते. याच पाश्वभूमीवर आज गुन्हे शाखा युनिट ७ च्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कासेवाडी येथे कोंबिग ऑप्रेशन हाती घेतले होते.

जनता वसाहत, तसेच दांडेकर पुल परिसरात सायंकाळी कोंबिग ऑपरेशन घेण्यात आले. त्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डवरील तसेच नुकतेच तुरुंगातून जामिनावर सुटून आलेल्या गुन्हेगारांची तपासणी केली. त्यांच्या घराची झडती घेऊन त्यांनी काही हत्यारे लपवून ठेवलेली नाहीत ना याची तपासणी केली. सुमारे १० ते १५ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले. शहरातील गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी सातत्याने अशा प्रकारची तपासणी वेगवेगळ्या वेळी आणि दिवशी करण्यात येणार आहे.