सोबत आले तर ‘नाही’तर ‘एकला चलो रे’, भाजपची स्पष्ट भूमिका

मुंबई :पोलिसनामा ऑनलाईन – सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करून सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेण्याची धमकी देत असतानाच मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता भाजपने एकाला चलो ची भूमिका घेतल्याची माहिती मिळत असून शिवसेना सोबत आली नाही तर भाजप सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपने शिवसेनेला मंत्रिमंडळात 16 मंत्रीपदे आणि उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असून त्यांनी ती स्वीकारायची कि नाही याची भाजप वाट बघणार नाही. तोपर्यंत 2014 प्रमाणे भाजपच्या मंत्र्यांचा शपथविधी करण्याचा विचार भाजपने केला आहे. त्यामुळे 7 नोव्हेंबरपर्यंत शिवसेना सत्तेत सहभागी झाली नाही तर फडणवीस सरकारचा शपथविधी करायचा, असा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपने महत्वाची मंत्रीपदे शिवसेनेला देण्याची तयारी दर्शवली आहे.

यामध्ये महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या मंत्रिपदाचा समावेश असून अर्थ आणि गृह खाती देण्यास मात्र भाजपने नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेना जर तयार असेल तर त्यांनी या शपथविधीच्या दिवशी आपल्या दोन मंत्र्यांचा शपथ देऊन सत्तेत असल्याचे दाखवून द्यावे आणि बाकी चर्चा सुरु ठेवाव्या, अशी ऑफर भाजपने शिवसेनेला दिली आहे.

लवकरच सरकार स्थापन
अकोला जिल्ह्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच सरकार स्थापन होणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

Visit : Policenama.com