मदत करण्यासाठी आले अन् डल्ला मारून गेले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नौदल अधिकाऱ्यांचे निधन झाल्याने मदत करण्यासाठी ते घरी आले होते. त्यावेळी त्यांना तेथे एक एटीएम कार्ड सापडले. त्यांनी ते हळूच खिशात टाकले. त्याच्या सहाय्याने त्यांनी मृत पावलेल्या नौदल अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल साडेदहा लाख रुपये लंपास केले. गोवंडी पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून दोघांना अटक केली आहे. रेहान मेमन (वय ३९) आणि कय्यूब सगीर खान (वय ३९, दोघे रा. नेहरुनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, नौदलातील निवृत्त कॅप्टन राल्फ कुटिनो यांचे ४ जूनला गोवंडीतील गंगा सोसायटीतील घरी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून साडेदहा लाख रुपये काढण्यात आल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी बँकेत चौकशी केली असता एटीएममधून ही रक्कम काढण्यात आल्याचे समजले. कुटिनो यांच्या भावाने तात्काळ गोवंडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी संबंधित एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे आढळले. त्यावरून पोलिसांनी नेहरू नगर परिसरात राहत असलेल्या रेहान मेमन आणि कय्यूब या दोघांकडे चौकशी करण्यात आली आहे. रेहानला नेहरु नगरमधून अटक केली.

रेहानने दोन साथीदारांच्या मदतीने कुटिनो यांच्या खात्यातील साडेदहा लाख रुपये लंपास केल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर त्याच्या अधिक चौकशीत कय्यूबला नेहरू नगर परिसरातून अटक करण्यात आली. आज रेहान आणि कय्यूबला न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कॅप्टन राल्फ कुटिनो घरात एकटेच राहत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची माहिती एक – दोन दिवसांनी कुटुंबीयांना मिळाली होती. कुटिनो यांचा भाऊ रिचर्ड (६२) हे कुर्ला येथील नेहरू नगर परिसरात राहतात. त्यांना भावाच्या निधनाची माहिती कळाल्यानंतर रिचर्ड यांनी मदतीसाठी रेहान आणि कय्यूबला कुटिनो यांच्या घरी नेले. मृतदेह घरातून बाहेर काढण्यासाठी रेहान मेमन आणि कय्यूब हे दोघे आले होते. त्या वेळी तेथे पडलेले एटीएम कार्ड त्याने चोरले आणि नंतर एटीएममधून रक्कम काढली. एटीएमवरील शेवटचे चार अंक हाच पासवर्ड असल्याचे रेहानने पोलीस चौकशीत सांगितले.