टंचाई आढावा बैठकीस आ. कर्डिलेंसह पाच आमदारांची दांडी

खा. विखेंनी घेतला 'हा' तालुका दत्तक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर तालुका टंचाई आढावा बैठकीसाठी प्रशासनाच्या यादीत निमंत्रित असलेल्या पाचही आमदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली. नगर तालुक्याला हक्काचा आमदार नसल्याने त्यांची भिस्त आता खासदारावर आहे.

त्यामुळे मी नगर तालुका दत्तक घेत आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगर तालुका टंचाई आढावा बैठक आज खा. विखे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सभापती रामदास भोर, माजी आमदार बबनराव पाचपुते, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आदी उपस्थित होते.

बैठकीस विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, अरुण जगताप, राहुल जगताप, संग्राम जगताप या पाच आमदारांना निमंत्रित केले होते. त्यांची नावे फलकावर प्रमुख उपस्थितामध्ये टाकण्यात आली. मात्र यापैकी कोणीच बैठकीस उपस्थित राहिले नाही. त्यावर खा. विखे म्हणाले, नगर तालुक्याला स्वतंत्र आमदार नाही. यामुळे तालुक्याची सगळी भिस्त आता खासदारावर आहे.

मी सरकारी योजनेप्रमाणे गाव दत्तक घेत नसतो, तर संपूर्ण तालुकाच दत्तक घेणारा खासदार आहे. यामुळे यापुढे नगर तालुका मी दत्तक घेत आहे. नगर तालुक्यातील ४४ गावांची बु-हाणनगर पाणी योजना जनसेवा फौंडेशनला चालविण्यास देणार आहे.

मताधिक्क्याच्या टक्केवारीनुसार गावांना निधी
ज्या गावाने मला सर्वोच्च मताधिक्य दिले. त्या गावाला तीन महिन्यात १५ लाखांचा विकास निधी देणार आहे. मताधिक्याच्या टक्केवारीनुसार गावांना निधी देण्यास प्राधान्य देणार आहे, असे विधान खा. विखे यांनी केले आहे.