PM मोदींची खिल्ली उडविणं कॉमेडियन जॉन ऑलिवरला पडलं ‘महागात’, ‘लास्ट वीक टुनाईट’वर भारतात ‘बंदी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीवर गेल्या काही दिवसांपासून टिका टिप्पणी होत असते. त्याचवेळी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीचेही भाजपाचे पाठीराखे समर्थन करण्यासाठी तितक्याच हिरीरीने पुढे येत असतात. मात्र, परदेशातील कोणी त्यांच्यावर टिका केली तर ते हे समर्थक खपवून घेत नाही. सीएए प्रकरणावरुन आपल्या ‘लास्ट वीक टुनाइट’ या कार्यक्रमात ब्रिटीश कॉमेडियन जॉन ऑलिवर यांनी खिल्ली उडविली होती. मात्र, ती त्यांना चांगलीच महागात पडली. मोदी समर्थकांनी त्यावर टिकेची झोड उडविल्यानंतर वॉल्ट डिज्नीची सहायक कंपनी हॉटस्टारने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हा कार्यक्रम हटविला आहे.

ब्रिटीश कॉमेडियन जॉन ऑलिवर हे राजकीय, सिनेमा जगतातील प्रसिद्ध व्यक्तींवर विनोदी व्यंगात्मक कार्यक्रम सादर करतात. गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या लास्ट वीक टुनाइट या कार्यक्रमात सीएएवर विस्ताराने चर्चा केली होती. ट्विटरवर हा कार्यक्रम खूप ट्रेंड पण झाला होता. ऑलिवर यांच्या या शोवर अनेक दिग्गज व्यक्तींनी ट्वीट पण केले होते. तसेच त्याला विरोधही केला होता. एचबीओ वर प्रसारित होणारा हा कार्यक्रम कंपनीने आपल्या साइटवरुन हटविला आहे.

यु ट्युबवर अजूनही तो उपलब्ध आहे. या कार्यक्रमात ऑलिवर यांनी शोची सुरुवात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत दौरा यावरुन केली होती. त्यानंतर त्यांनी सीएए वर टिप्पणी केली. त्यात त्यांनी मोदी यांना तिरस्काराचे प्रतिक म्हटले होते आणि त्यांची तुलना प्रेमाचे प्रतिक ताज महाल याच्याबरोबर केली होती.

हे प्रथमच झालेले नाही. यापूर्वी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेजॉन प्राईम इंडियाने सीबीएस शो मॅडम सेक्रेटरीच्या सीजन ६ चा पहिला एपिसोड बॅन केला होता. त्यामध्ये हिंदू राष्ट्रवादासंबधित गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे त्यावर बंदी आली होती.