‘स्त्री’ चित्रपटानंतर राजकुमार राव ‘या’ नव्या कॉमेडी हॉरर चित्रपटात  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या वर्षी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर अभिनित ‘स्त्री’ या चित्रपटाने चांगलीच लोकप्रियता मिळवली. बॉक्स ऑफिसवर तर तब्बल १०० कोटींची कमाई या चित्रपटाने केली. या चित्रपटातील राजकुमाराने केलेल्या भूमिकेचे कौतुक देखील करण्यात आले. त्यानंतर आता राजकुमार पुन्हा एका हॉरर चित्रपटात दिसणार आहे.

‘रुह अफ्जा’ असं राजकुमारच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते दिनेश विजन आणि राजकुमार पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली होती. मात्र चित्रपटाचं नाव निश्चित झालेलं नव्हतं. त्यानंतर आता हे नाव निश्चित झाल्यानंतर अधिकृतपणे चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

कसा असेल ‘रूह अफ्जा’ ?
‘स्त्री’ प्रमाणेच ‘रूह अफ्जा’ हादेखील एक भयपट असून या चित्रपटातून राजकुमार राव प्रेक्षकांना घाबरवणार आहे. या भितीला विनोदाचा तडकादेखील असणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनामध्ये कोठेही कमी पडायला नको यासाठी निर्मात्यांनी वरुण शर्मा या दिग्गज कॉमेडी स्टारलाही चित्रपटात कास्ट केलं आहे. वरुणने यापूर्वी फुकरे या चित्रपटात काम केलं आहे.

दरम्यान, या चित्रपटात उत्तर प्रदेशातील मुरादाबादची कथा दाखवण्यात येणार असून राजकुमारच्या अपोझिट कोणती अभिनेत्री झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. लवकरच त्याचीही घोषणा होईल, असं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त राजकुमार मेड इन चायना, मेंटल है क्या या चित्रपटांत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.