Live PC सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्… (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ याचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत स्मिथचा मुलगा कार्टर आपल्या बाबांना पत्रकार परिषद थांबवून एक मदत करायला सांगत आहे. तसेच स्मिथने देखील बापाच कर्तव्य पार पाडत त्याची मदत केल्याने सध्या हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. ग्रॅम स्मिथ व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे एका पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता त्यावेळचा हा व्हिडिओ आहे.

खूप वर्षानंतर आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि टी-20 मालिका खेळण्यात येणार आहे. या संदर्भातील पत्रकार परिषदेत स्मिथ पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. त्याचवेळी स्मिथचा मुलगा कार्टर हातात बॅट आणि बूट घेऊन आला. यावेळी व्हिडीओद्वारे बाबा कोणाशी तरी बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने हळूच बूट पायात घातला आणि स्मिथच्या जवळ येऊन दबक्या आवाजात म्हणाला, बाबा, बुटाची लेस बांधून द्या ना, कार्टरचा हा निरागसपणा पाहून सारेच चाहते अतिशय आनंदी झाले. स्मिथनेदेखील दोन मिनिट वेळ मागून घेत मुलाच्या बुटाची लेस बांधून दिली आणि त्याला खेळायला पाठवले. घरातल बापाचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल पत्रकारानेही स्मिथचे हसतहसत अभिनंदन करून पत्रकार परिषद पुढे सुरु केली.