Coronavirus : पुणेकरांना दिलासा ! विदेशात प्रवास केलेल्यांपासूनचा ‘धोका’ टळला

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसने देशात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. पुण्यात परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला विविध ठिकाणी तसेच त्यांच्या घरामध्ये क्वारंटान करण्यात आले होते. अशा तब्बल 24 हजार नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आता या नागरिकांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असून त्यांच्यात कोरोना संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षण दिसून आलेली नाहीत. त्यामुळे पुणे शहरावरील परदेशात जाऊन आलेल्या हजारोकडून होणारा संभाव्य धोका टळला आहे.

पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि मुंबईमध्ये बाहेरून येणारी विमानसेवा 21 मार्चपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जे नागरिक परदेशातून आले आहेत त्यांना पुण्यात येऊन 14 दिवसापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. काहींना पुण्यात येऊन 21 दिवसांचा अवधी झाला आहे. प्रशासनाने परदेशातून आलेल्या सर्वांचिच विमानतळावर कोरोनाची लक्षणे आढळतात का ? याची तपासणी केली होती.

शिक्का मारून होम क्वारंटाइन

ज्या प्रवाशांमध्ये कोरनाची काही लक्षणे आढळली होती त्यांना पालिकेच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तर ज्यांच्यामध्ये कोणतेही लक्षण आढळून आले नाही त्यांना त्यांच्याच घरी शिक्कामारून क्वारंटाईन करण्यात आले होते. या सर्वांचा कालावधी आता संपला असून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्यापासून आता कोरोनाचा संसर्ग होण्याचा कोणताही धोका नाही. मात्र, या नागरिकांनी पुढील आदेश मिळेपर्यंत लॉकडाऊनचे नियम मोडायचे नाहीत. त्यांनी घरातच बसून रहायचे आहे.

या देशातून आलेल्यांना कोरोना

परदेशातून आलेल्या अनेक नागरिकांपैकी 22 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यापाकी आबुधाबीवरून आलेल्या 1, दुबई 8, फिलिपिन्स 2, थायलंड 1, टोकियो 1, अमेरिका 3, नेदरलँड 1, स्कॉटलंड 1, आर्यलंड 1, कतार 1 आणि साऊथ अफ्रिकेतून आलेल्या 1 अशा 22 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 966 जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. परंतु परदेशातून आलेले व संसर्ग झालेले बहुतांश रुग्णांचा अहवाल सध्या निगेटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेले व कोरोनाची बाधा झालेले रुग्ण वेळीच निदान झाल्याने बरे झाले आहेत.

तरीही काळजी आवश्यक

पुण्यात मागील चार दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, गुरुवारी यामध्ये घट झाली आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. पुण्यात 176, पिंपरी-चिंचवडमध्ये 22 आणि ग्रामीण भागात 12 कोरोनाचे रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे.