घशात हात घालून सत्ता बाहेर काढली, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा

मुंबई:वृत्तसंस्था

खूप साऱ्या शब्दांपेक्षा एक चित्र बरेच काही सांगून जाते. कर्नाटकात झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता खास आपल्या शैलीत कर्नाटक निवडणुक निकालाबद्दल व्यंगचित्र रेखाटले आहे. राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे.

राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणूक निकालावर आपल्या व्यंगचित्रातून भाष्य केले आहे.घशात हात घालून सत्ता बाहेर काढली, असे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटले आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हात भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या घशात दाखवला आहे. अमित शाह खाली बसलेले आहेत. तर राहुल गांधींच्या बाजूला जनता दलाचे (सेक्युलर) नेते कुमारस्वामी दिसत आहेत.
राज ठाकरेंचे नव्या व्यंगचित्राची राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा आहे.

राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभेच्या निकालादिवशीही फेसबुक, ट्विटरवर पोस्ट केली होती. ईव्हीएमचा विजय असो, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांनी व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा साधला आहे.