MPSC परीक्षेबाबत आयोगाकडून नियमावली जाहीर !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) पुढील महिन्यामध्ये घेतल्या जाणार्‍या स्पर्धा परीक्षांसाठी कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची नियमावली जाहीर केलीय. परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यापासून ते परीक्षा देऊन बाहेर पडेपर्यंत उमेदवारांनी काय करावे?, काय करू नये? याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

राज्य सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. त्यासाठी ही नियमावली जाहीर केलीय.

परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना उमेदवाराने तीन पदरी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. परीक्षा कक्षात मास्क, हातमोजे आणि सॅनिटाईझरची लहान पिशवी असे कीट उमेदवारांना दिले जाणार आहे. दोन्ही सत्रांसाठी एक कीट असणार आहे. या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी हात सतत सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे.

ताप, सर्दी, खोकला असे कोरोनाची लक्षणे असल्यास संबंधित उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी,कर्मचार्‍यांना माहिती द्यावी. प्रत्येकाने ‘आरोग्य सेतू’ हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे.

प्रतिबंधित क्षेत्रामधील परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी बदलल्यास त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर आणि उमेदवाराला एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना सोशल डिस्टन्स ठेवावे लागणार आहे. वापरलेले टिश्यु पेपर, मास्क, हातमोजे, सनिटाईझ पाऊच कचरा कुंडीतच टाकावे, अशा सूचना दिलेल्या आहेत.

जेवणाचा डबा सोबत आणावा
एमपीएससीची परीक्षा दोन सत्रात होणार आहे. या काळात परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर उमेदवारास बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे जेवणाचा डबा, पाण्याची बाटली सोबत न्यावी लागणार आहे. तसेच परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य वापरण्यास मज्जाव केला आहे.