मुंबईचे नवे CP हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट, चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   भाजपासह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे. याकरिता भाजपाचे शिष्टमंडळ बुधवारी (दि. 24) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. पण त्यापूर्वीच मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

आजच वाझे प्रकरणात उचलबांगडी करण्यात आलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी होमगार्डच्या मुख्यालयात हजेरी लावत महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर काही वेळातच राज्यपाल भवनाने ट्विट करून मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सदिच्छा भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्यपालांनी नगराळे यांच्याशी काय चर्चा केली हे समजले नाही. तरी देखील वाझे प्रकरण, अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लागलेले आरोप आणि परमबीर सिंगांचा सचिन वाझे प्रकरणात असलेला सहभाग आदी मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

वाझे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. वाझेंची नियुक्ती कोणी केली ते मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तांची अक्ष्यम्य चुकांमुळे उचलबांगडी या साऱ्या प्रकरणांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच गृहमंत्री देशमुखांनी वाझेंना दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात करून खळबळ उडवून दिली आहे. गृहमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे परमबीर यांनी मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांना सांगितले होते, असे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपाचा मुद्दा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत तर भाजपाचे खासदार राकेश सिंह यांनी लोकसभेत उचलून धरला आहे.