खंडपीठाच्या मागणीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना समितीचा इशारा

कोल्हापूर :पोलीसनामा ऑनलाईन – उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची आठ ते दहा दिवसांत नेमणूक होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या खंडपीठाचा प्रस्ताव त्यांना दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कृती समितीला दिले होते. चंद्रकांत पाटील यांनी हे आश्वासन न पाळल्यास खंडपीठासाठी तीव्र आंदोलन केले जाईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सरकारच जबाबदार असेल, असा इशारा कोल्हापूरच्या महापौर शोभा बोंद्रे यांनी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत दिला.

वकिलांची संघटना तब्बल तीस वर्षांपासून खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलने करत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी संघटनेची मागणी आहे. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची खंडपीठ कृती समितीबरोबर शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीनंतर दुसऱ्या दिवशी फक्त कोल्हापूरचे नाव टाकून अहवाल न्यायाधीशांना देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. पालमंत्र्यांनी समितीला आठ ते दहा दिवसांचा अवधी द्या, असे सांगितले होते. पालकमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर खंडपीठ कृती समितीची महापौरांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत महापौर शोभा बोंद्रे म्हणाल्या, खंडपीठ ही काळाची गरज आहे, कारण कोल्हापूरसह शेजारच्या सहा जिल्ह्यांतील लोकांना मुंबईत न्यायालयीन कामकाज जावे लागते. ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आजपर्यंत शासनाने पोकळ आश्वासने दिली आहेत. आता पक्षकारांच्या संयमाचा बांध सुटला आहे. गुरुवारच्या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी दिलेले आश्वासन न पाळल्यास खंडपीठासाठी तीव्र आंदोलन केले जाईल. या आंदोलनास माझा पूर्णपणे पाठिंबा असेल, असे महापौर म्हणाल्या. बैठकीस जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. विवेक घाटगे, ॲड. प्रकाश मोरे, ज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे, वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, किशोर घाटगे, पद्माकर कापसे, दुर्गेश लिंग्रस, अशोक पवार, कॉ. चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत खोंद्रे, शिवाजी जाधव, बाबूराव कदम, प्रसाद जाधव, राजू जाधव, स्वप्नील पार्टे, वैशाली महाडिक, रूपाली पाटील, जाहिदा मुजावर, दीपा पाटील आदी उपस्थित होते.