‘सर्वसामान्य नागरिक हा माझा प्राधान्यक्रम राहील’ : मनपा आयुक्त शेखर गायकवाड

महापालिकेत कायद्याच्या पलिकडे मानवी भावना समजून घेउन निर्णय घ्यायचे शिकलो : सौरभ राव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – साखर आयुक्तपदावरून पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झालेले शेखर गायकवाड यांनी आज दुपारी सौरभ राव यांच्याकडून आयुक्तपदाची सुत्रे स्विकारली. सामान्य माणसांचे प्रश्‍न अर्थात वाहतूक, पाणी या दैनंदीन गरजांच्या प्रश्‍नांसोबतच संस्थात्मक आणि सार्वजनिक प्रश्‍नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्यासाठी माझे प्राधान्य राहील, असे गायकवाड यांनी पदभार स्विकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गायकवाड म्हणाले, की पुण्यात माझे शिक्षण झाले असून यशदा, भूजल सर्वेक्षण आणि साखर आयुक्त म्हणून पुण्याशी माझा संबध जोडला आहे. येथील प्रश्‍नांची मला जाणीव आहे. शहरात पाऊल ठेवताच वाहतुक कोंडीचे दृश्य पाहायला मिळते. आयटीमध्ये काम करणार्‍या युवकांनाही कामाच्या ठिकाणी व तेथून घरी जाण्यासाठी दीड ते दोन तास जातात, हे दृश्य संवेदनशील मनाला पटत नाही. शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासोबतच अत्यावश्यक पाण्याच्या प्रश्‍नावरही माझा फोकस असेल. भुजल सर्वेक्षण आयुक्त म्हणून काम करताना पुण्याच्या भूगर्भातील पाणीसाठ्याबाबतही माझा अभ्यास झाला असून सर्वांना पुरेसे पाणी मिळेल, यासाठी दक्षता घेईन.

आयुक्त म्हणून सौरभ राव यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य शासनात मंत्रालयात केलेल्या कामाचा अनुभव निश्‍चित कामाला येईल. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नाला प्राधान्य राहील. यासाठी पुढील तीन महिन्यांत शहरातील शैक्षणिक संस्थांसारख्या मोठ्या आस्थापनांचे प्रश्‍न आणि त्यावरील उपायांचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यास माझे प्राधान्य राहील. यानंतरच नागरिकांच्या वैयक्तिक कामांचा क्रमांक असेल.

दरम्यान, माजी आयुक्त सौरभ राव यांना निरोप देण्यासाठी महापालिका कामगार परिषदेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना सौरभ राव म्हणाले, की बाहेरून येणार्‍या अधिकार्‍याला पुणे महापालिका नेहमीच आपली वाटते. संस्कृतीचे शहर आहे. परंपरा टिकवून ठेवत आधुनिकीकरणाची संधी मिळते. दैनंदिन जीवनामध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या लोकांसोबत काम करताना अनुभव फार वेगळा आहे. केवळ जीआर प्रमाणे निर्णय घ्यायचा झाला तर संगणक पुरेसा आहे. परंतु याठिकाणी सामाजिक भावना डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीनुरुप निर्णय घ्यावा लागतो. येथे २१ महिन्यात भरपूर शिकायला मिळाले. प्रत्येक विभाग प्रमुखांकडुन अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्याकडे सर्वसामान्य नागरिकांची सकाळपासूनच्या गरजेचे समाधान महापालिकेला करावे लागते. इथे काम करणे आव्हान आहे. पुणे मनपा आयुक्त म्हणून काम केल्यानंतर कुठेही काम करू शकता, असे एका वरिष्ठांनी कानमंत्र दिलाय. त्यामुळे सध्या साखर चहा मध्ये टाकून पितात, यापेक्षा काही माहिती नसले तरी दहा दिवसांत शिकून घेईल.

फेसबुक पेज लाईक करा –