ऑनलाईन पद्धतीने १५ देशांतून एकत्रितपणे दत्तभक्त करणार ‘घोरात्कष्टात स्तोत्रा’ चे सामुदायिक पठण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाईन पद्धतीने सामाजिक भान राखत यंदा १५ देशांतून एकत्रितपणे शेकडो दत्तभक्त सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुहिक पठण करणार आहेत. कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि प. पू. नाना महाराज तराणेकर, इंदोर प्रणीत अखिल भारतीय त्रिपदी परिवार तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरात रविवार, दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले आहे. ग्लोबल स्ट्रिमिंग सिस्टीमद्वारे एकाचवेळी देशांतर्गत तसेच परदेशातही होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी दिली.

दत्तमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बी. एम. गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उत्सव उपप्रमुख नंदकुमार सुतार, विश्वस्त अंकुश काकडे, अ‍ॅड. एन. डी. पाटील, उल्हास कदम, चंद्रशेखर हलवाई आदींनी उत्सवाचे नियोजन केले आहे. दत्तमंदिर ट्रस्टचे यंदा १२३ वे वर्ष आहे.

कोविड च्या पार्श्वभूमीवर यंदाचा दत्तजयंती उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. दत्तजयंती सप्ताहाचा प्रारंभ शुक्रवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशीनिमित्त सायंकाळी ५ वाजता मंदिरामध्ये आयोजित कीर्तनसेवेने होणार आहे. ह. भ. प. विश्वासबुवा कुलकर्णी हे कीर्तन सादर करणार आहेत. शनिवार, दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्री विद्या साधना हा महिलांचा गट ललितासहस्त्रनाम पठण करणार आहे.

रविवारी (दि.२७) मंदिरामध्ये घोरात्कष्टात मंत्रपठण होणार आहे. प्रातिनिधीक स्वरुपात २१ दत्तभक्त मंदिरातून तर संपूर्ण जगभरातून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम इत्यादी देशांमधून शेकडो दत्तभक्त यामध्ये सहभाग घेणार आहेत. तसेच सोमवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता लघुरुद्राचे नियोजन करण्यात आले असून २१ महिला रुद्रपठण करणार आहेत. यंदाचे सर्व कार्यक्रम मंदिरामध्ये होणार आहेत. ट्रस्टच्या कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे – https://www.facebook.com/107521001159281 या फेसबुक पेजवरुन भाविकांना सर्व कार्यक्रम घरबसल्या पाहता येणार आहेत. तरी भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.