बरे होण्यापूर्वीच घरी सोडल्याने डॉक्टरची ‘कोरोना’ केंद्राविरुद्ध तक्रार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या रुग्णाची चाचणी न करताच उपचार केंद्रात जुजबी उपचार करुन सोडले जात असल्याची अनेक घटना घडल्या आहेत. केवळ सात दिवस उपचार केल्याचे सोपस्कार पूर्ण केल्याचा अनुभव एका डॉक्टरलाच आला आहे. त्यांनी आता आरोग्य व्यवस्थेच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध आवाज उठविला आहे.

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. विजय मकासरे यांना सर्दी व ताप आल्याने त्यांनी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करून घेतली. त्यात त्यांना बाधा झाल्याचे आढळून आले. प्रकृती चांगली असल्याने ते राहुरीच्या विवेकानंद नर्सिग होममधील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल झाले. सात दिवस त्यांनी उपचार घेतले. पण या काळात त्यांना सरकारी व्यवस्थेचा अत्यंत वाईट अनुभव आला. डॉ. मकासरे यांनी सांगितले, की रुग्णालयात स्वच्छता नाही.

सर्वत्र घाण होती. तक्रार केल्यानंतर सफाई केली जात होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचार करणारे डॉक्टर येऊन रुग्णांना तपासत नव्हते. ते केंद्रात येऊन केवळ विचारणा करतात. मधुमेह असणार्‍या रुग्णांची रक्ततपासणी केली जात नव्हती. तक्रार केल्यावर तपासणी सुरू केली. रुग्णांचे तापमान तपासले जात नव्हते. केवळ रुग्ण दाखल झाल्यावर औषधे दिली जातात.

ती कशी घ्यायची हे सांगितल्यानंतर कोणी फिरकत नाही. रुग्णांना काय लक्षणे आहेत, हे समजून न घेता दुर्लक्ष केले जाते. गरम पाणी प्यायला दिले जात नाही. उपचार केंद्रात सारा आनंदीआनंद आहे. तहसीलदार ,आरोग्य अधिकारी तर केंद्राकडे फिरकतही नाहीत, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार त्यांनी समस्यांचा पाढा वाचला आहे.