भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध पुण्यात तक्रार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुण्यात देखील त्यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत विक्षिप्त वक्तव्य केल्याने राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांच्याबाबत भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बेतालपणे वक्तव्य केले होते. त्याचे राज्यात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळले जात आहेत. तर निदर्शने केली जात आहेत.

दरम्यान पडळकर यांचा वक्तव्याचा जनमानसात देखील पडसाद उमटला आहे. तर भाजपकडून देखील हे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान बारामती शहर पोलीस ठाण्यात याबाबतचा राज्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आज पुणे शहर राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यामुळे हा वाद मिटण्याची चिन्हे नाहीत.