चेक न वटल्याप्रकरणी खासदार पुनम महाजन यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयात तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार आणि भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष पुनम महाजन यांच्याविरोधात मुंबईतील एका व्यावसायिकाने धनादेश न वटल्याप्रकरणी तक्रार केली आहे. पुनम महाजन यांच्या होंडा सीटीच्या आद्या मोटर कंपनी प्रा. लि.कडून होंडा सिटी खरेदीच्या प्रकरणात दिलेले धनादेश न वटल्याने व्यावसायिक परविंदर सिंग यांनी तक्रार केली आहे.

परविंदर सिंग यांनी पुनम महाजन , त्यांचे पती वजेंदला राव, मुंबईतील मिलिंद सुर्वे आणि आद्या मोटर कंपनी यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. तिघेही आद्या मोटर कंपनीचे संचालक आहेत.

परविंदर सिंग हे असेट ऑटो प्रा. लि. चे मालक आहेत. त्यांचे कार्यालय पुण्यात आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१५ मध्ये त्यांना कॅब सर्विस सुरु करायची असल्याने कार खरेदी करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी मुंबईतील आद्या मोटर कंपनीशी संपर्क साधला. यासंदर्भात ते संचालकांना भेटले. त्यांना ११ होंडा सिटी खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली. त्यावेळी त्यांनी संचालकांच्या विनंतीवरून ६८ लाख ७५ हजार रुपये दिले . त्यात ६. २५ लाख रोख तर ६२.५० लाख बँकेतून ट्रान्सफर केले . त्यानंतर सिंग यांना रितसर ११ पावत्याही देण्यात आल्या . तसेच कन्फर्मेशन लेटरही देण्यात आले. त्यात ऑर्डर रद्द केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही . तसेच सिंग यांना सर्व रक्कम त्यांनी मागितल्यास देण्याचे नमूद केले होते.

मात्र त्यानंतर कारची डिलिव्हरी तात्काळ देण्याचे मान्य करूनही त्यांनी ती दिली नाही. महिनाभर वाट पाहिल्यावर त्यांनी बुकींग रद्द करण्याचा आणि रक्कम परत मागण्याचे ठरविले. त्यांनी सिंग यांना १७.५० लाख रुपये त्यावेळी परत केले. परंतु उर्वरित रक्कम दोन वर्षांपर्यंत परत केली नाही . त्यानंतर मागील वर्षी मार्च मध्ये सिंग यांना ३१ लाख व २०.२५ लाख रुपयांचे दोन चेक देण्यात आले. मात्र १२ मार्च २०१८ रोजी ते खात्यात रक्कम नसल्याने वटले नाहीत. त्यानंतर सिंग यांनी यासंदर्भात चेक बाऊन्सची तक्रार केली.

त्यापुर्वी २०१५ मध्ये त्यांनी सिंग यांच्याकडे २ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. सिंग यांनी त्यांना हे शॉर्ट टर्म लोनही मंजूर केले. २ कोटी रुपये कोणत्याही तारणाशिवाय १० महिन्यांच्या हप्त्यांमध्ये परत करण्याचे त्यांना मान्य केले. त्यानंतर राव यांना २ कोटी रुपयांचे कर्जाची प्रतही देण्यात आली. त्यांनी १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम डिसेंबर २०१५ पर्यंत परत केली. परंतु त्यानंतर उर्वरित रक्कम परत केली नाही. त्यानंतर काही वर्षे पाठपुरावा करूनही त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यांनी ५० लाख रुपये व्याजासहित उर्वरित रक्कम परत करण्याचे मान्य केले. आणि १ कोटी ५० लाखांचे चेक दिले. त्यानंतर तेही वटले नाहीत. त्यामुळे सिंह यांनी कलम १३८ नुसार कायदेशीर नोटीस बजावत तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयात सिंग यांनी तीन खटले दाखल केले आहेत. तसेच दोन खटल्यांमध्ये तिनही संचालकांना समन्स पाठविले आहेत. त्यांनी दोन प्रकरणांत पुनर्विचार करण्यासंदर्भात अर्ज दिला आहे. तसेच पुनम महाजन यांनी चेक बाऊन्स होण्याआधीच कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचा काही संबंध नाही असा युक्तीवाद त्यांच्या वकीलांनी केला आहे. असे सिंग यांचे वकील सिद्धार्थ पाटील यांनी सांगितले. चेक न वटल्याचच्या दोन केस आहेत. तर तिसरा १. कोटी ५० लाखाचा चेक वटला नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ मार्च रोजी आहे. असे त्यांनी सांगितले.

तर महाजन या कंपनीच्या संचालक होत्या. परंतु त्यांनी २०१५ मध्ये या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर चेक बाऊन्स झाले आहेत. त्यामुळे चेक बाऊन्स प्रकरणात त्यांचा काही संबंध नाही. आ्म्ही याप्रकरणी पुनर्विचार अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. तसेच त्यांचे नाव या केसमधून वगळण्याची विनंती न्यालालयाला केली आहे. त्यांना चुकीच्या पद्धतीने चेक बाऊन्स प्रकरणात पार्टी करण्यात आले आहे. असे महाजन यांची बाजू मांडणारे वकिल विनय व्यास यांनी सांगितले.