पुणे ग्रामीणच्या पोलिसावर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे ग्रामीणमधून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात समाविष्ठ झालेल्या पोलीस ठाण्यात दाखल असणारे गुन्ह्यांचे अर्ज तपासासाठी (निर्गती) दिले असताना त्याचा तपास न करता, ते जमा न करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुणे ग्रामीणचे अधीक्षकांनी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही न घाबरता आपलीच मनमानी करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल झाल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत.

पुणे ग्रामीणच्या वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एम.बी. सुळ यांच्या विरुद्ध भादवी कलम २१७, २१८, १८८ प्रमाणे चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर या प्रकरणी महिला पोलीस शिपाई दिपाली थोरात यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुळ हे चाकण पोलीस ठाण्यात २००८ पासून कार्यरत होते. मात्र पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर त्यांची बदली झाली. २०१५ पासून त्यांच्याकडे सुमारे ५० हुन अधिक गुन्ह्यांचे अर्ज निर्गती करायला दिले होते. वरिष्ठ निरीक्षकांच्या आदेशानुसार सुळ यांना हे गुन्हे तपासायला दिले होते. या गुन्ह्यांच्या अर्जाचा अंतिम अहवाल, दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे गरजेचे असताना ते अद्याप पर्य़ंत सादर केले नाही. यामुळे याचा फायदा या गुन्ह्यातील आरोपींना निर्दोष सुटका होण्यासाठी होऊ शकतो. यामुळे निष्काळजी आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल केला आहे. सुळ यांच्याकडे भाग पाचचे २५, भाग सहाचे ७, दारूबंदीचे १७ आणि बेपत्ताचे चार गुन्ह्यांचे अर्ज आहेत.

सुळ यांच्या प्रमाणे चाकण पोलीस ठाण्यातून बदलून ग्रामीण पोलीस दलात गेलेल्या आणखी पोलिसांनी गुन्ह्यांचा तपास न करता गुन्ह्यांचे अर्ज जमा केले नाहीत. याबाबत पोलीस अधीक्षक, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना दिल्या मात्र तरीही गुन्ह्यांचे अर्ज जमा केले नाहीत. वरिष्ठ निरीक्षकांनी आदेश देऊनही काहीच फरक पडलेला नाही. यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच इतरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.