तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या भीतीमुळे सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि खासगी कार्यक्रम, सभा-संमेलनाला शासनाने बंदी घातली असताना 200 लोकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत महापालीका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध गणेश पेठ पोलीसांकडे एका नागरिकाने तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरु केली असून या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मनीष प्रदीप मेश्राम (रा. सिरसपेठ, नागपूर) असे तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी एका व्हिडिओचा संदर्भ या तक्रारीत दिला आहे. त्यानुसार, आयुक्त तुकाराम मुंढे हे येथील हॉटेल राजवाडा पॅलेसमधील सभागृहात 31 मे 2020 रोजी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला सुमारे 200 लोक उपस्थित होते आणि मंचावरून त्यांनी या लोकांना संबोधित केले असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसून येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमांचे कुठल्याही प्रकारे पालन करण्यात आले नसल्याचे मेश्राम यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

कोरोना महामारीच्या काळात, भारत सरकारने अद्याप कोणत्याही स्वरूपाच्या राजकीय, समाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही, असे असताना मुंढे यांनी या समारंभात उपस्थित राहून सरकारच्या दिशानिर्धेशांचा भंग केल्याचे मेश्राम यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुंढे यांनी असा कार्यक्रम आयोजित करून 200 लोकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. नागरिकांची गर्दी होऊन महामारीचा प्रादुर्भाव वाढेल, अशी शासन विरोधी कृती करून एका सनदी अधिकाऱ्याने शासनाच्या मार्गदर्शक तत्वाला हारताळ फासला आहे.

अशा प्रकारे शासन विरोधी कृती करून, अनेकांचा जीव धोक्यात घालत मुंढे यांनी चुकीचा संदेश जनमानसात पसरवला आहे. ज्या अधिकाऱ्यावर नागपूर शहरातील महामारी रोखण्याची जबाबदारी आहे, नागरिकांची कोरोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्याची जबाबदारी आहे, तेच सनदी अधिकारी नियमांचे उल्लंघन करत असतील तर हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे.दरम्यान, या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी सांगितले की, मेश्राम यांची तक्रार प्राप्त झाली आहे. सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडून तक्रारीची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.